रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर

Foto
सोयगाव तालुक्यातील घटना

सोयगाव, (प्रतिनिधी) : कापुस वेचणी करताना अचानक रानडुकराने हल्ला चढवल्याने शेतकरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि.६) दुपारी एक वाजता अंजोळा शिवारात घडली. कांताबाई जयसिंग परदेशी (वय ४२) रा. वाकडी, ता. सोयगाव असे जखमी शेतकरी महिलेचे नाव आहे.

 त्यांना पाचोरा येथील खासगी दाखल करण्यात आले आहे. जयसिंग परदेशी यांची अंजोळा शिवारात गट नंबर-१०८ मध्ये शेती आहे. त्यांच्या पत्नी कांताबाई या ह्या या शेतात शनिवारी दुपारी कापूस वेचणी करीत असताना अचानकपणे रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. मांडीला कडाडून चावा घेत त्यांना गंभीररीत्या जखमी केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बंदोबस्त करण्याची मागणी : 
सोयगाव तालुक्यातील वाकडी, अंजोळा, तिडका, वरठाण, बनोटी परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रब्बीतील मका पिकाची ते नासधूस करत आहेत. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता ते अंगावर धाऊन येतात, हल्ला करतात अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. काही शेतकऱ्यांनी कपाशी फरदड ठेवली आहे. 

कापूस वेचणी करणाऱ्या महिलांवर रानडुकरं हल्ला चढवत आहेत. त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी जर्यासंग परदेशी, गोकुळ परदेशी, पोपट परदेशी, बाळू धुमाळ यांनी केली आहे.